Like Us

Tuesday, July 6, 2010

जेव्हा पाउस पडतो तुझी आठवण येते                                                                                  

जेव्हा पाउस पडतो
तुझी आठवण येते
मनाच्या कोपर्यात कुठेतरी
एक तार झंकारते

जेव्हा पाउस पडतो
तुझी आठवण येते
इच्छा नसतानाही मी
भूतकाळात हरवते

जेव्हा पाउस पडतो
तुझी आठवण येते
त्या नाजुक क्षणांची कुपी
अगदी अलगद उघडते

जेव्हा पाउस पडतो
तुझी आठवण येते
ढगांसोबतच
मनही भरून येते

जेव्हा पाउस पडतो
तुझी आठवण येते
अश्रुंना वाहायला
तेवढेच पुरेसे असते

पाऊस आणि खिडकी

पाऊस आणि खिडकी                                                                                                      


बालपणातला पाऊस, 
खिडकीतून माझ्या खोलीत डोकावायचा 
आणि हळूच माझ्याशी गुजगोष्टी करून 
मला तो हसवायचा. 
पागोळ्यांचे थेंब बघत मला 
त्याच्यात रमवून टाकायचा. 
कधी कधी तो मला चिंब भिजवायचा 
आणि भिजून झाल्यावर आईच्या कुशीत विसावायला लावायचा.


तारुण्यात हाच पाऊस, 
एका वेगळ्याच रूपात 
पावलांचा आवाज न करता येतो. 
आणि जाताना माझ्या मनाला पावले जोडून जातो 
हाच पाऊस खिडकीपाशी बसल्यावर 
त्याच्या आठवणीत मला रमवतो. 
आणि भविष्यातील अनेक स्वप्नांमध्ये रंग भरायला लावतो.


वार्धक्यात हाच पाऊस 
खिडकीतून बघायचा असतो. 
नातवंडांनी सोडलेल्या होडीबरोबर 
मनाला तरंगत भूतकाळात घेऊनoजातो. 
आठवणींच्या पागोळ्यांत 
मनाला तो चिंब भिजवतो. 
कधी रडवून तर कधी हसवून 
तो ऊन पावसाचा खेळ खेळतो. 


असा हा पाऊस जन्मापासून मरणापर्यंत खिडकीशी नाते जोडतो.

कोसळणारा पाऊस

" कोसळणारा पाऊस "                                                                                                    


कोसळणारा पाऊस
नेहमी मलाच गाठतो
छत्री भिरकावतो अन
सारखा चिखलात लोटतो

थैमान घालणारं त्याचं
आक्राळ विक्राळ रुप
ओलं चिंब होण्यात
मात्र तिला वाटे सुख

भिजलेली गाडी
भिजलेली साडी
भिजलेलं सारं रान
अन भिजलेली झाडी

कडाडणारी विज
तिची लावते ओढ
ओठांवरची चव
ओली चिंब गोड

सोसाट्याचा वारा
भान हरपून नेतो
छ्त्री जाते उडून
मी ओला चिंब होतो

कोसळणारा पाऊस
नेहमी मलाच गाठतो
थेंबा थेंबांनी बोचतो
सारखा आठवणीत लोटतो

Popular Posts